New Mumbai Railway : नवी मुंबईकरांसाठी पुढील दहा दिवसात एक मोठी भेट रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. दस्तूरखुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दहा दिवसात बेलापूर-खारकोपर-उरण या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण आणि दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नेरूळ अर्थातच बेलापूर – खारकोपर – उरण हा रेल्वे मार्ग प्रकल्प 1997 मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची प्रारंभिक किंमत 495 कोटी रुपये एवढी होती. हा प्रकल्प 2004 पर्यंत पूर्ण करण्याच टार्गेट ठेवण्यात आले होते.
मात्र हा प्रकल्प काही तांत्रिक कारणास्तव वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. सध्या या प्रकल्पाचा खर्च एक हजार 782 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हता यामुळे या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्याचे नियोजन रेल्वेने आखले.
यानुसार बेलापूर ते खारकोपर हे पहिल्या टप्प्यात करण्याचे आणि खारकोपर ते उरण हे काम दुसऱ्या टप्प्यात करण्याचे नियोजन आखण्यात आले. यानंतर 2018 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच बेलापूर ते खारकोपर पूर्ण झाला आणि हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा रेल्वे मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा देखील जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा नवी मुंबईकरांना होती.
मात्र पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही दुसरा टप्पा तयार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे अजूनही या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झालेले नाही. मात्र या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच आता हा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण येत्या 10 दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आहे.
कसा आहे प्रकल्प
बेलापूर-खारकोपर-उरण हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा सुधारित खर्च हा 1782 कोटी रुपये एवढा आहे. या मार्गिकेची एकूण लांबी 26.7 किमी एवढी आहे. यापैकी बेलापूर/नेरूळ ते खारकोपर हा पहिला टप्पा 12.4 किमी लांबीचा आहे. तसेच खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा 14.3 किमी लांबीचा आहे.
यातला पहिला टप्पा हा 2018 मध्ये पूर्ण झाला असून आता येत्या दहा दिवसात दुसरा टप्पा म्हणजेच खारकोपर ते उरण रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात गव्हाण, जसई, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी ही स्थानके राहणार आहेत.
निश्चितच हा प्रकल्प येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याने नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त दिघा रेल्वे स्थानक देखील प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे, यामुळे नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांना दुहेरी गिफ्ट रेल्वेच्या माध्यमातून मिळणार असे चित्र आहे.