NHAI New Expressway : देशातील विविध राज्यांमध्ये हायवे आणि एक्सप्रेस वे तयार केले जात आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. असं म्हणतात की, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते.
हेच कारण आहे की आता भारतात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष जोर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
आपल्या राज्यात समृद्धी महामार्ग सारख्या हायटेक एक्सप्रेस वे ची उभारणी केली जात आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. यापैकी 600 km लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे आणि हा पूर्ण झालेला मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू देखील झाला आहे.
उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे. नवीन वर्षात संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. याशिवाय इतरही अनेक रस्ते विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत.
काही महामार्गाची कामे येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत. अशातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशात 1316 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग विकसित करणार आहे. विशेष बाब म्हणजे हा महामार्ग चार राज्यांमधून जाईल आणि 10 शहरांना जोडणार आहे.
पंजाबमधील अमृतसर ते गुजरात मधील जामनगर दरम्यान हा महामार्ग विकसित होत आहे. या मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वेचा मोठा भाग वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. या एक्स्प्रेस वेचा सुमारे 500 किलोमीटरचा भाग राजस्थानमध्ये येतो.
हनुमानगड जिल्ह्यातील झाखरावली गावातून या महामार्गाची सुरुवात होते आणि जालोरच्या खेतलावासात हा मार्ग संपतो. हा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी 11,125 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर, राजस्थान आणि हरियाणा-पंजाबमधील अनेक मोठ्या शहरांमधील प्रवास सुखकर झाला आहे.
सध्या स्थितीला पंजाब मधील अमृतसर ते गुजरात मधील जामनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी 26 तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. पण जेव्हा हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा हा कालावधी 13 तासांवर येणार आहे. म्हणजे प्रवासाच्या वेळेत जवळपास निम्म्याने घट होणार आहे.
या मार्गामुळे पंजाब, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या राज्यांना थेट फायदा मिळणार आहे. विशेष बाब अशी की हा नव्याने विकसित होत असलेला मार्ग दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेशी जोडला जात आहे. यामुळे दिल्ली आणि काश्मीरपर्यंत पोहोचणेही सोपे होईल, असे बोलले जात आहे.
गुजरातमधून रस्ते मार्गाने थेट काश्मीर गाठणे सोपे होणार आहे. या मार्गाचा चार राज्यांव्यतिरिक्त अमृतसर, भटिंडा, मोगा, हनुमानगड, सूरतगड, बिकानेर, नागौर, जोधपूर, बारमेर आणि जामनगर या शहरांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. यामुळे या भागातील एकात्मिक विकास साधता येणे शक्य होणार आहे.