Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू करण्यात आली आहे.
परंतु हे एनपीएस धारक कर्मचारी ही योजना रद्दबातल करत पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. परंतु शासनाने कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. ज्यावेळी या मुद्द्यावर कर्मचारी आक्रमक बनतात त्यावेळी शासनाकडून कुठला ना कुठला तोडगा काढला जातो आणि हा मुद्दा लांबवला जात आहे.
या चालू वर्षातही राज्य शासनाने असेच केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च 2023 मध्ये राज्यातील जवळपास 17 ते 18 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. मार्चमध्ये झालेला हा संप राज्य शासनाला कोंडीत पकडणारा होता. या संपामुळे राज्य शासन पूर्णपणे बॅकफूटवर गेले होते.
संपूर्ण शासकीय यंत्रणा कोलमडली होती अशा परिस्थितीत या संपावर तोडगा काढणे जरुरीचे होते. विशेष म्हणजे शासनाने या बेमुदत संपावर देखील तोडगा काढला. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
जुनी पेन्शन योजनेबाबत या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. मात्र या समितीला वारंवार मुदतवाढ देण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
अशातच राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेवरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील लाखो कर्मचारी 9 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवल्या पाहिजेत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाईक रॅली काढणार आहेत.
ही बाईक रॅली राज्यभर काढली जाणार असून यामध्ये राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यानंतर देखील जर जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील महासंघाच्या माध्यमातून यावेळी सरकारला देण्यात आला आहे.