Onion Price Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात जात आहेत. कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. एकतर आधीच रब्बी हंगामात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे उन्हाळी कांदा पीक संकटात आले. यामुळे उत्पादनात घट आली.
शिवाय अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली. यामुळे उन्हाळी कांदा काढणी केल्याबरोबरच शेतकऱ्यांना विकावा लागला. अशा परिस्थितीत बाजारात आवक वाढली आणि बाजारभावात मोठी घसरण झाली. जानेवारी ते मे या काळात कांदा खूपच कवडीमोल दरात विकावा लागला.
मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत होता. पण जून महिन्यात थोडीशी परिस्थिती बदलली. पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल या भावात विकला जाणारा कांदा 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जाऊ लागला. जून महिन्यात देखील सरासरी बाजार भाव हा अपेक्षित असा नव्हता.
परंतु जानेवारी ते मे महिन्याच्या तुलनेत थोडासा समाधानकारक होता. गेल्या जून महिन्यात कमाल बाजार भाव 1000 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास होते जे की शेतकऱ्यांचा तोटा भरून काढण्यासाठी पुरेशे नव्हते. मात्र जुलै महिन्याची सुरुवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर ठरली आहे. आज एक जुलै 2023 रोजी राज्यातील महत्त्वाच्या बाजारात कांद्याला 2600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव
आज आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख प्राप्त असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दराने विक्रमी टप्पा गाठला आहे. आज लासलगाव मध्ये उन्हाळी कांदा 2600 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज लासलगाव एपीएमसी मध्ये 15000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या या लिलावात किमान 700 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला तर कमाल 2600 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला.
तसेच सरासरी बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बाजारात आज दरात थोडीशी सुधारणा झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आज 900 रुपये प्रतिक्विंटल ते 1400 रुपये प्रति क्विंटल या सरासरी बाजार भावात कांदा विकला गेला आहे.