Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याचे बाजार भाव वधारत आहे. खरंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीच्या दोन आठवड्यापर्यंत कांद्याचे दर तेजीतच होते. मात्र तदनंतर केंद्रशासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण तयार झाले. अनेक तज्ञांनी केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन अप्रत्यक्षरीत्या कांदा निर्यात बंदी केल्याचा आरोप केला. कारण की, कांदा निर्यातीसाठी आधी कोणतेच शुल्क आकारले जात नव्हते. मात्र शासनाने देशातील किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे किरकोळ बाजारातील किमती कमी होतात की नाही हे तर माहिती नाही परंतु घाऊक बाजारात यामुळे किमती घसरू लागल्या आहेत. साहजिकच याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. तज्ञांच्या मते जर केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असती तर शासनाच्या विरोधात मोठा आवाज उठवला गेला असता.
सरकारचा निषेध झाला असता. आगामी वर्षात लोकसभा आणि अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत निर्यात बंदीचा निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची नाराजी ओढावून घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन अप्रत्यक्षरीत्या निर्यात बंदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
या निर्णयामुळे देशातून कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याचा साठा वाढू लागला आहे आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर थोडे कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात हळूहळू तेजी येऊ लागली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. आज देखील राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या विकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज पारनेर एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याचे 8350 क्विंटल आवक झाली. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 300, कमाल 2600 आणि सरासरी 1650 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.