Onion Rate Will Reduce : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पवित्र सण साजरा झाला आहे. या सणाच्या दिवशीच नवरात्र उत्सवाची सांगता देखील झाली आहे. दरम्यान नवरात्र उत्सवानंतर कांद्याच्या बाजारभावात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात नवरात्र उत्सवाच्या काळात दरवर्षी कांद्याची मागणी कमी होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदू सनातन धर्मात नवरात्र उत्सवात कांदा आणि लसूण यांसारख्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. याशिवाय, नवरात्र उत्सवाच्या काळात हिंदू कुटुंबांमध्ये मांसाहार देखील सेवन होत नाही.
मद्यपानाचे सेवन होत नाही. अशा परिस्थितीत या कालावधीत कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होत असते. पण आता नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. यामुळे, आता देशांतर्गत कांद्याची मागणी विक्रमी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आता बाजारभावात सुधारणा झाली आहे.
काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल 8,000 रुपयाचा भाव मिळाला आहे. तसेच राज्यातील दौंड केडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
याशिवाय इतरही अन्य महत्वाच्या बाजारात कांद्याचा कमाल बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद करण्यात आला आहे. सरासरी बाजार भावात देखील चांगली सुधारणा झाली आहे. सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यातील कांदा उत्पादकांची दिवाळी झाली आहे. आता खऱ्या अर्थाने कांदा उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न वातावरण आहे. खरीप हंगामात कमी पावसामुळे चिंतेत आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद लवकरच कमी होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरतर कांद्याच्या विक्रमी वाढलेल्या किमती यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढली आहे.
पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत, तसेच काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत. यामुळे सरकार निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना नाराज करण्याच्या मूडमध्ये नाहीये. दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याची किरकोळ बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बफर स्टॉकमधील कांदा 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात विकला जाणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होईल अशी आशंका व्यक्त होत आहे. यामुळे साहजिकच कांदा उत्पादकांना फटका बसणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कंजूमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल एग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात विकला जाणार आहे.