Panjab Dakh Havaman Andaj : गेली तीन वर्षे अर्थातच 2020 पासून ते 2022 पर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मान्सून काळात समाधानकारक पाऊस झाला आहे. हवामान तज्ञांच्या मते हे तीन वर्ष ला निनाची असल्याने मान्सून काळात चांगला पाऊस पडला. मात्र यंदा अर्थातच 2023 मध्ये एल नीनो सक्रिय राहणार असल्याचा अंदाज जवळपास दोन ते तीन महिन्यांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाने वर्तवला.
यामुळे भारतासह आशिया खंडात दुष्काळाचे सावट राहील अशी भीती अमेरिकेच्या हवामान विभागाने त्यावेळी व्यक्त केली. भारतातील काही प्रमुख हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी आणि हवामान तज्ञ लोकांनी या गोष्टीला दुजोरा दिला.
भारतीय हवामान विभागाने मात्र एलनिनोची जरी कबुली दिली असली तरी देखील याचा प्रभाव हा कमी राहील आणि दुष्काळ पडणार नाही असा अंदाज वर्तवला. मात्र हवामान विभागाने जरी दुष्काळ पडणार नाही असं म्हटलं असलं तरीदेखील मान्सूनच आगमन लांबलं आणि आता गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून मान्सून प्रगती करत नसल्याने हे दुष्काळाचे संकेत तर नाही ना अशी चर्चा रंगत आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना देखील मान्सून कसा राहतो? याबाबत चिंता लागून आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एक माहिती दिली आहे. पंजाब डख यांनी यंदा दुष्काळ पडणार नाही असे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं आवाहनही त्यांनी केले आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आगमन झाल्यानंतर अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास हा प्रभावित झाला. चक्रीवादळाने बाष्पीभवन आणि वातावरण मधील आद्रता ओढून घेतली म्हणून पावसासाठी पोषक हवामान तयार होत नव्हते.
मात्र आता चक्रीवादळ निवळले असून 25 जून पासून मान्सूनची तीव्रता वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 25 जून पासून राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 26, 27 आणि 28 जून रोजी मान्सून राज्यातील बहुतांशी भागात प्रवेश करेल आणि राज्यात मुसळधार पाऊस होईल असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
25 जून पासून ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. निश्चितच राज्यात आगामी काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे रखडलेल्या पेरण्या आता पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं आशादायी चित्र तयार होत आहे.