Panjab Dakh News : जुलै महिन्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. एक जुलै ते सहा जुलै राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. नासिक, अहमदनगर, पुणेसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात तसेच खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर चांगला राहिला आहे. मात्र पुढील दोन दिवसात आता कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात 14 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. 14 जुलैपासून म्हणजेच येत्या शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल आणि 17 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. या पावसामुळे ज्या भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असतील त्या भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा दावा देखील पंजाब डख यांनी केला आहे.
वास्तविक, राज्यातील बहुतांशी भागात सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र काही भागात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही यामुळे त्या ठिकाणी पेरणी अद्याप बाकी आहे. मात्र आता या भागात देखील 15 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण होईल असा आशावाद पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे.
14 जुलै, 15 जुलै, 16 जुलै आणि 17 जुलै रोजी राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच त्यांनी जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
याआधी जुलै महिन्यात कधीच एवढा पाऊस पडलेला नसेल असा पाऊस यंदा पडेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 9 जुलै 2023 रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
यासोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.