Panjabrao Dakh Fortuner Car : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात पंजाबराव डख हे नाव विशेष चर्चेत आले आहे. शेतकऱ्यांमध्ये या माणसाची कायमच चर्चा राहते. पंजाब डख हे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देतात. त्यांचा हवामान अंदाज हा खरा ठरतो. यामुळे, शेतकरी हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतात.
डख यांचे लाखो शेतकरी जबरा फॅन आहेत. पंजाबराव म्हणजे देव माणूस, शेतकऱ्यांसाठी राबणारा माणूस असं म्हणतं शेतकरी या माणसाचे गोडवे गाताना थकत नाहीत. पण डख यांच्यावर काही आरोपही लावण्यात आले आहेत. अनेकांनी पंजाबरावांवर काही गंभीर आरोप लावले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये एक ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल झाली होती.
या क्लिपमध्ये नासिक येथील एका शेतकऱ्याने डख यांच्यावर पैसे घेऊन हवामान अंदाज सांगत असल्याचा मोठा आरोप केला होता. यामुळे त्यांच्या विश्वासहर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. दरम्यान आता पंजाब डख यांनी नवी कोरी 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा पंजाबरावांचे नाव चर्चेत आले. सोशल मीडियामध्ये डख यांनी घेतलेल्या चाळीस लाखाच्या फॉर्चूनर गाडीची विशेष चर्चा आहे.
सोशल मीडियामध्ये डख यांचे विरोधक आणि समर्थक परस्परांना भिडू लागले आहेत. अनेकांनी त्यांनी गाडी घेतली म्हणून काय झाले, गाडी घेतली तर त्यात वावगे काय? असं म्हणत त्यांना पाठिंबा दाखवला. तर अनेकांनी ढगात बाण मारून गाडी घेतली असं म्हणत चिमटा काढला आहे.
यासोबतच काही लोकांकडून गाडी घेण्यासाठी एवढा पैसा कुठून आला हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. आता मात्र या सर्व प्रश्नांचे उत्तर पंजाबराव डख यांनी स्वतः दिले आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
फॉर्चूनर गाडी घेण्याचे कारण काय ?
डख यांनी फॉर्चूनर गाडी का घेतली ? असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून विचारला जात होता. दरम्यान, ह्या मुलाखतीत त्यांनीच याचे उत्तर दिले आहे. ते म्हटले की, या पाच वर्षांच्या काळात त्यांनी 14 हजाराहून अधिक गावांना भेटी दिल्या आहेत. ते दिवसाच्या 24 तासाहून जवळपास 16 घंटे गाडीतच असतात. अर्थातच ते 16 घंटे बाहेर असतात.
विविध गावांना भेटी देतात, शेतकरी मेळाव्यात समाविष्ट होतात आणि शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देतात. यामुळे या प्रवासादरम्यान अपघात होण्याची भीती असते. आतापर्यंत ते बोलेरो या गाडीवर प्रवास करत आलेत. या गाडीला मात्र एकच एअर बॅग असते. साहजिकच अपघात झाल्यास व्यक्तीचे आयुष्य या गाडीत धोक्यात येऊ शकते.
यामुळे त्यांनी त्यांच्या आरटीओ मित्रांना कोणती गाडी घ्यावी जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित होईल याबाबत विचारणा केली. सुरुवातीला इनोव्हा गाडी घेण्याचे ठरले होते मात्र त्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स खूपच कमी आहे. यामुळे त्यांनी फॉर्च्युनर ही गाडी घेण्याचे ठरवले. फॉर्च्यूनर गाडीमध्ये सात एअर बॅग असल्याने ही गाडी निश्चित करण्यात आली.
गाडी घेण्यासाठी पैसा कुठून आला
पंजाबरावांनी तब्बल 40 लाखाची फॉर्च्यूनर गाडी घेतली यामुळे ही गाडी घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला. त्यांना ही गाडी कोणी गिफ्ट केली का? ते कंपनीकडून पैसे घेतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान यावर डख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की ‘मला कोणतीच कंपनी पैसे देत नाही, मीं कोणाकडूनच पैसे घेत नाहीत.’
मग गाडी घेण्यासाठी पैसे कुठून आलेत. यावर ते उत्तर देताना सांगतात की त्यांना दर वर्षी सव्वाशे क्विंटल सोयाबीन आणि सव्वाशे क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन होते. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातूनच त्यांनी गाडीसाठी पैसा जमवला आहे. त्यांच्या धर्मपत्नींने चांगल्या सुरक्षित गाडीने प्रवास करा नाहीतर प्रवास करू नका ! अशी तंबी दिली असल्याने त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी त्यांनी शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून विकत घेतली आहे. दरम्यान शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंजाब डख काही मानधन घेतात का? हा देखील प्रश्न अनेकांनी विचारला होता. यावर त्यांनी उत्तर दिले असून शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जे लोक त्यांना बोलावतात त्यांच्याकडून ते प्रवासासाठी लागणारा खर्च आणि अल्पशे मानधन स्वीकारतात.
मात्र हे पैसे प्रवासासाठीच खर्च होतात. दरवर्षी गाडीच्या टायरसाठीच हे पैसे खर्ची होतात असे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले आहे. एकंदरीत डख यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली असून ही गाडी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशाने घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.