Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात 18 मे पासून पूर्व मौसमी पावसाचा जोर कमी होणार असे म्हटले आहे. पण, पंजाबरावांनी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 18 मे ते 24 मे या कालावधीत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण या विभागात पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या भागांमध्ये अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या भागात सर्व दूर पाऊस होणार नाही तर विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे पंजाबरावांनी म्हटले आहे. एकंदरीत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर आता कमी होणार आहे.
फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आगामी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र 27 मे च्या सुमारास पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार असा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणार चक्रीवादळ
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ते 23 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये देखील या चक्रीवादळाची चर्चा रंगली होती.
दरम्यान पंजाब रावांनी देखील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर फारसा विपरीत परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या चक्रीवादळामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असा अंदाज आहे, पण पावसाचा जोर कमी राहणार आहे. म्हणजे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही.
हे चक्रीवादळ कोलकत्ता आणि बांगलादेशच्या दिशेने निघून जाणार आहे. आपल्या राज्यात या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून 27 ते 28 मे दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे.
दुसरीकडे पंजाब रावांनी १८ मे ते २७ मे या कालावधीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे सदर राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.