Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. एक जून ते 21 जून या कालावधीत राज्यात केवळ 11.5% पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम संकटात आला होता. मात्र 25 जून पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढला.
राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढला आहे. आज देखील राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील 19 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, आज सात जुलै रोजी महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच पुणे आणि सातारा या जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे.
यासोबतच कोकणातील ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात आणि विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. अशातच पंजाब डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी राज्यात आठ जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच पंजाब डख यांनी 10 जुलै पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा आशावाद व्यक्त केला आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या दहा जुलैपर्यंत पेरण्या होणार नाहीत त्यांच्या पेरण्या 15 जुलै दरम्यान पूर्ण होतील. कारण की, 13 जुलै ते 17 जुलै रोजी राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.