Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरतर, 17 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
या चक्रीवादळाला ‘मिधिली’ असे नाव देण्यात आले आहे. या हंगामात बंगालच्या खाडीत तयार झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. याआधी बंगालच्या उपसागरात हामून चक्रीवादळ तयार झाले होते.
पण हामून चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम झाला नव्हता. विशेष बाब म्हणजे या नवीन मिधिली चक्रीवादळाचा देखील महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसून राज्यात या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुठेच वादळ, अवकाळी पाऊस होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
पण आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ढगाळ हवामान तयार होणार असलं तरी देखील राज्यात कुठेच अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा महत्त्वाचा अंदाज दिला आहे.
विशेष बाब म्हणजे आता राज्यात अवकाळी पाऊस पडणार नसून थंडीचा जोर वाढेल असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे त्यांनी रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी गरजेनुसार पाणी द्यावे असा सल्ला दिला आहे.
सोबतच राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात होणार असल्याने या थंडीचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा सोबतच मका यांसारख्या पिकांना मोठा लाभ मिळणार आहे. नुकतेच पेरणी केलेल्या पिकाच्या वाढीसाठी गुलाबी थंडी फायदेशीर ठरेल अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. तसेच आगामी काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याने आता रब्बीच्या पिकांसाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.