Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहतो तशीच वाट सध्या बळीराजा पाहत आहे.
खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या अवस्थेत पिकांना पावसाच्या पाण्याची गरज आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असल्याने पिकांच्या वाढीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात खूप मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीमध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, बीड, पंढरपूर, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, संगमनेर या भागात खूप मोठा पाऊस पडणार असे भाकीत वर्तवले आहे.
विशेष म्हणजे गेली दोन महिने ज्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे त्या जिल्ह्यात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान खूप मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. साहजिकच असं झालं तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यांच्या मते राज्यात 22 ऑगस्ट पर्यंत सर्वदूर पाऊस होणार आहे. हा पाऊस पूर्वेकडून येणार असून यामुळे पूर्वेकडील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. उर्वरित राज्यातही जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो असे देखील त्यांनी या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.