Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमान हळूहळू घट होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील गारठा आता वाढत आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता हळूहळू वाढणार आहे. दरम्यान, ही थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक राहील आणि यामुळे नुकतीच पेरणी झालेली पिके वाढतील असा अंदाज आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान विभागाने 24 नोव्हेंबरला राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस पडणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
वास्तविक पंजाबरावांनी आपल्या मागील हवामानांना जात राज्यात 24 नोव्हेंबर पर्यंत कोरडे हवामान राहणार असे स्पष्ट केले होते.
पण आता पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजामध्ये राज्यात 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडणार असे सांगितले आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भातील काही भाग, मराठवाड्यामधील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस होणार असे त्यांनी नमूद केले आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. पण या कालावधीत पडणारा पाऊस हा अवकाळी असून अवकाळी पाऊस कधीच सर्व दूर पडत नाही, अस डख यांनी सांगितलं आहे.
म्हणजेच या कालावधीमध्ये या संबंधित भागात सर्व दूर पाऊस पडणार नाही. एखाद्या जिल्ह्यात काही भागात पाऊस पडेल तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहील यामुळे शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
एकंदरीत महाराष्ट्रात 24 नोव्हेंबर पासून ढगाळ हवामान तयार होईल आणि 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात होईल आणि 27 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहील असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.