Panjabrao Dakh Monsoon News : आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस. हा संपूर्ण महिना मात्र महाराष्ट्रासाठी खूपच त्रासदायक ठरला आहे. कारण की या संपूर्ण महिन्यात केवळ 40% एवढा पाऊस झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे.
उर्वरित 26 दिवसांच्या कालावधीत पावसाचा खंड राहिला आहे. म्हणजेच भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके करपली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागातील पिकांची अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. खरीप पिकांसोबतच फळबाग पिकांना देखील पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे.
डाळिंब, द्राक्ष यांसारखी पिके पाण्याच्या ताणामुळे प्रभावित झाली असून उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शेती पिकांसमवेतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. यामुळे शेतकरी पशुपालक मोठ्या चिंतेत सापडले आहेत. विशेष म्हणजे आगामी काही दिवस पाऊस झाला नाही तर राज्यावर पिण्याच्या पाण्याचे देखील संकट कोसळणार आहे.
खरंतर राज्यातील काही भागात आत्ताही टँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. भर पावसाळ्यात जर टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असेल तर आगामी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात परिस्थिती यापेक्षा बिकट होण्याची भीती आहे. यामुळे राज्यात सर्वत्र पावसासाठी देव नवसला जात आहे.
देवाकडे जोरदार पावसासाठी विनवणी केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात तरी जोरदार पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जर सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला तर राज्यावरील पिण्याच्या पाण्याचे संकटही दूर होईल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सप्टेंबर महिन्यातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 2 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. यामध्ये दोन सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच 5 सप्टेंबरनंतर विदर्भात आणि 6 सप्टेंबरला मराठवाड्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 6, 7, 8 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार असे पंजाबरावांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि या कालावधीत चांगला पाऊस पडतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.