Panjabrao Dakh News : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त एका महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाने मोठी दांडी मारली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत वावरत होता. मात्र या चालू सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडणार असे बोलले जात आहे. सात सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
राज्यातील अनेक प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे. राज्यातील छोटी-छोटी धरणे आता शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही.
सात सप्टेंबर पासून राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सात, आठ आणि नऊ तारखेला राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
पण राज्यातील काही भागावर अजूनही दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे. अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे राज्यात 14 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
14 सप्टेंबर पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब अशी की 16 सप्टेंबर नंतर राज्यात पावसाचा जोर खूपच वाढणार आहे. 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे ज्या भागात आत्तापर्यंत म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही त्या भागात चांगला पाऊस पडणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे. पंजाबरावांनी सांगितले की, राज्यातील काही भागात 13 सप्टेंबर पासूनच पाऊसाला सुरुवात होणार आहे. 13 सप्टेंबरला पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे.
यानंतर 14 सप्टेंबरला पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच 15 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे. 16 सप्टेंबर पासून राज्यात सर्व दूर पावसाला सुरुवात होईल. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असे त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे.
या कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे मांजरा, उजनी आणि जायकवाडी यांसारख्या प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढणार असे देखील यावेळी पंजाब रावांनी सांगितले आहे. तसेच 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहेत.