Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरंतर पंजाबरावांचा हवामान अंदाज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूपच विश्वासार्ह आहे. त्यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांना हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक विश्वास आहे.
यामुळे शेतकरी बांधव पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, पंजाब रावांनी दोन दिवसांपूर्वी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. यात त्यांनी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
कुठं बरसणार अवकाळी अन गारपीट ?
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 10 फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अर्थातच आजपासून पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मात्र यानंतर राज्यातील हवामानात बदल होईल आणि राज्यात पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. या कालावधीमध्ये राज्यातील नागपुर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अवकाळी पावसासह काही भागात गारपीटीची शक्यता आहे.
याशिवाय राज्यातील अमरावती, अकोला, चांदुर बाजार, वाशीम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत राज्यातील विदर्भ विभागात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.
विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये या कालावधीत पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना या कालावधीत आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तेथील शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेऊन आपल्या शेतीकामांचे नियोजन करणे आवश्यक राहणार आहे.