Panjabrao Dakh News : ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास 21 ते 22 दिवसांचा खंड पडला. यामुळे खरीप हंगामातील पिके व्हेंटिलेटरवर पोहोचलीत. काही भागातील पिके पावसाअभावी करपलीत. पण भारतीय हवामान विभागाने आणि काही हवामान तज्ञांनी या चालू सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस होईल आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना देखील लागली होती. मात्र नियतीला यावर्षी काही औरच मान्य आहे. या चालू सप्टेंबर महिन्यात देखील राज्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही.
सप्टेंबर महिन्यात देखील महाराष्ट्रमध्ये खूपच कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन ते चार दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची हजेरी लागली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण 10 सप्टेंबरनंतर राज्याकडे पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे.
राज्यात 14 सप्टेंबर रोजी अर्थातच बैलपोळ्याच्या दिवशी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला मात्र सर्व दूर पावसाची हजेरी लागली नाही. गणेश चतुर्थीला देखील राज्यात मोठा पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं मात्र गणेश चतुर्थीला देखील पावसाने हुलकावणी दिली आहे.
गणेश चतुर्थीला राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस झाला पण अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रात 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच त्यांनी ऑक्टोबर महिन्यात राज्यात कसं हवामान राहणार? याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात एक चक्रवात तयार होत आहे याचा परिणाम म्हणून तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून हा कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडमार्गे मध्यप्रदेश मग विदर्भ आणि तेथून मग उत्तर महाराष्ट्राकडे सरकरणार आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यात 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे. तसेच या प्रणालीमुळे 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडेल असे सांगितले आहे. पण या कालावधीमध्ये राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नसून भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
यासोबतच त्यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामानाबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चांगला बरसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आगात सोयाबीन पेरणी केलेली असेल आणि त्यांचे सोयाबीन ऑक्टोबरमध्ये काढणीसाठी तयार होत असतील तर अशा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी 5 ऑक्टोबरच्या पूर्वीच सोयाबीनची काढणी करून घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या खाडीत 3 ऑक्टोबरच्या सुमारास एक तीव्र चक्रीवादळ तयार होणार असून याचा परिणाम म्हणून राज्यात 5 ऑक्टोबर नंतर अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस देखील चांगला पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.