Panjabrao Dakh : येत्या दोन दिवसात ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपणार आहे. मात्र या पहिल्या पंधरवड्यात राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडला नाही. यामुळे फुलोरावस्थेत असलेले सोयाबीन पीक संकटात सापडले असून कापूस, मका, तूर इत्यादी पिकांना देखील आता पावसाच्या पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे.
विशेष म्हणजे खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकांना देखील पाण्याची गरज आहे. फळबागांना देखील पावसाची आवश्यकता आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आता आभाळाकडे नजरा आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची प्रतीक्षा करतो तशीच प्रतीक्षा सध्या शेतकऱ्यांना पावसाची आहे.
दरम्यान, एल निनोचा प्रभाव म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भीती आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक हवामान अंदाज समोर येत आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी महाराष्ट्रात आता पुन्हा जोरदार पावसाला केव्हा सुरुवात होणार? याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी जोरदार पावसाला केव्हा सुरवात होणार याची थेट तारीखच सांगितली आहे. यामुळे सध्या पंजाबरावांचा हवामान अंदाज सर्वत्र चर्चेचा विषय सिद्ध होत आहे.
जोरदार पावसाला केव्हा सुरवात होणार ?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पासून पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होणार आहे. याचाच अर्थ गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट रोजी अर्थातच स्वातंत्र्यदिनी पावसाची शक्यता आहे. तसेच 16 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढेल आणि 30 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
एवढेच नाही तर पंजाब रावांनी आणखी अडीच महिने मानसून बाकी असल्याचा दावा केला आहे. अजून अडीच महिने राज्यात जोरदार पाऊस होईल, यंदा दुष्काळ पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीच चिंता करू नये असे देखील त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.
विशेष बाब अशी की यावर्षी राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाण्याचा साठा तयार होईल, प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान या ऑगस्ट महिन्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान, सप्टेंबर महिन्यात 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान आणि ऑक्टोबर महिन्यात 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि सोळा तारखेपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होते का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.