Vande Bharat Express : भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच या गाडीची लोकप्रियता खूपच वाढली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम वाराणसी ते नवीन दिल्ली या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत जवळपास 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवण्याचा प्लॅन रेल्वेने आखला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण पाच महत्त्वाचा मार्गावर ही गाडी चालवली जात आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपूर या पाच महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय, येत्या काही महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, पुणे ते सिकंदराबाद, नागपूर ते सिकंदराबाद यांसारख्या अन्य महत्वाच्या मार्गावर ही गाडी चालवण्याचा प्लॅन आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आज अर्थातच 19 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणामध्ये मोदक दिले जाणार आहेत. जेवणात गोड पदार्थ म्हणून मोदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता गणेश भक्तांना गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मोदकाचा प्रसाद दिला जाणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशन ( आयआरसीटीसी) कडून कंत्राटदाराला मोदकांची ऑर्डर देण्यात आली आहे.
राज्यातून धावणाऱ्या मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि मुंबई ते गांधीनगर या वंदे भारतने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज 19 सप्टेंबर आणि उद्या 20 सप्टेंबर रोजी मोदकाचा प्रसाद दिला जाणार आहे.