Pm Kisan Yojana : केंद्र शासनाने देशभरातील गरजू शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे. ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते. हे 6000 रुपये दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने शेतकऱ्यांना वितरित होतात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 13 हप्ते मिळाले आहेत. आता शेतकरी बांधव 14 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या योजनेच्या चौदाव्या हप्ता संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा चौदावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.
मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन वेरिफिकेशन केली आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्थातच ज्या शेतकऱ्यांची केवायसी ची प्रक्रिया बाकी असेल त्यांनी उद्यापर्यंत जर ही प्रक्रिया केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
नमो शेतकरीचाही लाभ मिळणार नाही
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे. तसेच या नमो शेतकरी योजनेचे सर्व निकष हे पीएम किसान प्रमाणेच ठरवण्यात आले आहेत. अर्थातच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो त्यांनाच नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे आता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा हप्ता देखील मिळणार आहे. यामुळे जर या योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी केली नाही तर नमो शेतकरीचा देखील लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
ई-केवायसी कशी करणार
यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर जायचे आहे. या पर्यायावर गेल्यानंतर तिथे केवायसी चा ऑप्शन दिसेल. या केवायसीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक एंटर करावा लागेल. आधार क्रमांक इंटर केल्यानंतर आधार क्रमांक सोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी दिलेल्या रकान्यात भरल्यानंतर तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.