Pomegranate Rate : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः डाळिंबाची लागवड गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त वधारली असल्याचे चित्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डाळिंबाला मिळणारा भाव. खरतर डाळिंब हे देखील एक खर्चिक पीक म्हणून ओळखले जाते.
मात्र डाळिंबाला कायमच शाश्वत भाव मिळत असल्याने अलीकडे शेतकऱ्यांनी या पिकाला चांगली पसंती दाखवली आहे. राज्यातील नासिक, पुणे, अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात होते. नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
याव्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आजूबाजूच्या परिसरातही डाळिंब शेती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दरम्यान महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला विक्रमी भाव मिळाला आहे.
जुन्नर एपीएमसी मध्ये शुक्रवारी अर्थातच 8 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला तब्बल आठ हजार रुपयाचा भाव मिळाला आहे. म्हणजेच डाळिंब तब्बल 400 रुपये प्रति किलो या भावात विकले गेले आहे. जुन्नर एपीएमसी प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात 735 डाळिंब कॅरेटची आवक झाली होती. यात जंबो डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला ८००० रुपये, एक नंबर डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला ५००० रुपये व दोन नंबर डाळिंब कॅरेटला ४००० रुपये आणि तीन नंबर डाळिंबला तीन हजार रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळाला होता.
निश्चितच जुन्नर एपीएमसीच्या आळेफाटा उपबाजारात डाळिंबाला चांगला विक्रमी भाव मिळाला असल्याने परिसरातील अस म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यातील डाळिंब उत्पादक मोठे समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.