Property Rights : भारतात संपत्तीच्या कारणावरून मोठ-मोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. मालमत्तेवरून संपत्तीवरून भावंडांमध्ये वाद विवाद होतात. नवरा-बायकोत सुद्धा संपत्तीच्या कारणावरून भांडणे पाहायला मिळतात. नवरा-बायकोमध्ये जेव्हा घटस्फोटसारखी परिस्थिती तयार होते तेव्हा संपत्तीवरून वाद पाहायला मिळतात. अशातच अनेकांच्या माध्यमातून पत्नीच्या संपत्तीवर किंवा मालमत्तेवर पतीचा अधिकार असतो का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? दरम्यान याच संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पत्नीच्या संपत्तीवर पतीचा अधिकार आहे की नाही याबाबत महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. पत्नीच्या संपत्तीवर अर्थातच स्त्रीधनावर पतीच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने या निकालात अनेक गोष्टी क्लियर केल्या आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सुप्रीम कोर्टाने नुकत्याच एका महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी पूर्ण केली आहे.
या ऐतिहासिक निकालात माननीय सर्वोच्च न्यायालयाने पत्नीकडे असलेल्या स्त्रीधनावर पतीचा अधिकार असतो का ? याबाबत निकाल दिला आहे. माननीय न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, पत्नीच्या ‘स्त्रीधन’ पतीचे नियंत्रण राहू शकत नाही. मात्र संकटाच्या वेळी पती आपल्या पत्नीच्या स्त्रीधनाचा वापर करू शकतो.
पण, ते स्त्री धन पत्नीला परत करण्याची पतीची नैतिक जबाबदारी असल्याचे मत यावेळी माननीय न्यायालयाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना पुरुषाला महिलेच्या हरवलेल्या सोन्याच्या बदल्यात २५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात, महिलेने दावा केला होता की तिच्या कुटुंबीयांनी तिला लग्नाच्या वेळी 89 सोन्याची नाणी भेट दिली होती. तसेच लग्नानंतर तिच्या वडिलांनी पतीला दोन लाखांचा धनादेश दिला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने तिचे सर्व दागिने आपल्या ताब्यात घेतले आणि सुरक्षिततेच्या नावाखाली आईला दिले.
तिने आरोप केला की पती आणि त्याच्या आईने त्यांच्या आधीच असलेल्या आर्थिक कर्जाची पूर्तता करण्यासाठी सर्व दागिन्यांचा गैरवापर केला आहे. कौटुंबिक न्यायालयात 2011 मध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी कौटुंबिक न्यायालयाने पती आणि त्याच्या आईने याचिकाकर्ता महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर केला आहे आणि त्या गैरवापरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यास ती पात्र आहे.
पण, केरळ उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल अंशतः नाकारला. केरळ उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, ती महिला तिच्या पती आणि त्याच्या आईने सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर सिद्ध करू शकली नाही. मग काय सदर महिलेने केरळ उच्च न्यायालयाच्या या निकाला विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
माननीय सर्वोच्च न्यायालयात मग या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने यावर आता निकाल दिला आहे. माननीय न्यायालयाने असे सांगितले आहे की, ‘स्त्रीधन’ मालमत्ता ही पत्नी आणि पतीची संयुक्त मालमत्ता नसते.
अशा मालमत्तेवर किंवा संपत्तीवर पतीचा कोणताच अधिकार नसतो. पण पती या संपत्तीचा त्याच्या अडचणीच्या काळात वापर करू शकतो मात्र ही संपत्ती किंवा स्त्रीधनं नैतिक जबाबदारी म्हणून पतीने पत्नीला परत देणे आवश्यक आहे.
आता तुम्हाला स्त्रीधन मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो हा प्रश्न पडला असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्त्रीला लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी किंवा विभक्त होण्याच्या वेळी किंवा लग्नानंतर भेटवस्तू दिलेली मालमत्ता म्हणजे तिची स्त्रीधन संपत्ती. अशा मालमत्तेवर पतीला अधिकार नसतो. ती पत्नीची एकट्याची संपत्ती असते. संकटाच्या काळात पती याचा वापर करू शकतो मात्र ही संपत्ती पतीची होऊ शकत नाही.