Property Rights : आपल्या समाजात संपत्तीवरून नेहमीच वादविवाद होत असतात. भावंडांमध्ये, पिता-पुत्रांमध्ये, बहिण भावांमध्ये प्रामुख्याने संपत्तीचे वाद पाहायला मिळतात. अनेकदा तर संपत्तीचा वाद विकोपाला जातो आणि अशी प्रकरणे न्यायालयात जातात.
संपत्तीच्या वादावरून कित्येकदा नात्याला काळीमा फासण्यात आली आहे. संपत्तीच्या वादापायी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. खरेतर संपत्तीबाबत असणारे नियम सर्वसामान्यांना समजत नाहीत.
यामुळेच प्रॉपर्टी वरून वादविवाद होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान संपत्ती बाबत वेळोवेळी न्यायालयाकडून देखील महत्वाचे निर्णय समोर आले आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने संपत्ती मधील मुलींच्या हक्कांबाबत असाच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
वडिलांच्या कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलींच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक मोठा निर्णय दिला आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जर वडिलांचे कोणतेही मृत्यूपत्र न करता मृत्यू झाला तर मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर त्यांच्या भावांपेक्षा किंवा इतर नातेवाईकांपेक्षा जास्त हक्क असल्याचे घोषित केले आहे.
एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की, इच्छापत्राशिवाय किंवा मृत्युपत्राशिवाय मृत्यू झालेल्या पुरुषाच्या मुलींना वडिलांची स्व-संपादित आणि इतर मालमत्ता मिळण्याचा हक्क असेल आणि मुलींना कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा प्राधान्य असेल.
न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर हिंदू पुरुषाने मृत्युपत्र केले नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुला-मुलींना वारसाहक्काने मिळालेली संपत्ती आणि स्व-अधिग्रहित मालमत्तेमध्ये समान अधिकार असतील.
मुलगा नसेल तर मुलीला मिळणार संपत्ती
माननीय न्यायालयाने जर एखाद्याला मुलगा नसेल आणि मृत्यूपत्राशिवाय त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलीचा वारसा आणि स्व-अधिग्रहित मालमत्तेवरचा हक्क तिच्या चुलत भावापेक्षा जास्त असेल असा महत्त्वाचा निर्णय यावेळी दिला आहे.
कोर्टाने असे म्हटले आहे कारण की, देशात मिताक्षर कायद्यातील कोपरसेनरी आणि सर्व्हायव्हरशिप या संकल्पनेनुसार, पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती फक्त पुत्रांमध्येच विभागली जाते आणि जर मुलगा नसेल तर ती संयुक्त कुटुंबातील पुरुषांमध्ये विभागली जाते.
मात्र कोर्टाने जर एखाद्या पित्याला मुली असतील मुलगा नसेल आणि मृत्युपत्राशिवाय त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी त्याच्या संपत्तीवर संयुक्त कुटुंबातील इतर पुरुष सदस्यांपेक्षा त्याच्या मुलीचा हक्क जास्त राहणार असे स्पष्ट केले आहे.