Pune Highway News : राज्यात सध्या विविध रस्ते विकासाच्या कामांनी गती पकडली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी विविध रस्ते तयार केले जात आहेत. यामध्ये पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात देखील विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होत आहे. रस्ते वाहतूक सुधारत असल्याने सर्वसामान्यांना वाहतूक कोंडी मधून आता बऱ्यापैकी दिलासा मिळू लागला आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आता पुणे जिल्ह्यातील कोकणातील रायगडला जाण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. खरे तर पुण्याहून रायगडाला आणि रायगडहून पुण्याला येणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. अशा स्थितीत या नवीन मार्गाचा या संबंधित लोकांना मोठा फायदा मिळणार आहे. सध्या स्थितीला पुणे जिल्ह्यातून रायगडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
भोर तालुक्यातून रायगडला जाणाऱ्या लोकांसाठी वरंध घाट मार्गे रस्ता उपलब्ध आहे तर मुळशी तालुक्यातून रायगडला जाणाऱ्या लोकांसाठी तामिनी घाट मार्गे रस्ता उपलब्ध आहे. अशातच आता वेल्हे तालुक्यातील भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते यादरम्यान नवीन रस्ता तयार केला जाणार आहे.
या रस्त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना रायगडला जाण्यासाठी तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय हा तिसरा पर्यायी मार्ग इतर दोन मार्गांच्या तुलनेत सोईस्कर राहणार आहे. या नवीन रस्त्यामुळे जवळपास 20 ते 30 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होणार आहे.
दरम्यान या नवीन रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पाच कोटी रुपये असे एकूण 30 कोटी 32 लाख रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी संशोधन आणि विकास विभागाकडे आणखी चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
याला देखील लवकरच मंजुरी मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे लवकरच या नवीन रस्त्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाणे सोयीस्कर होणार आहे.
कसा असणार नवीन रस्ता
हा नवीन रस्ता वेल्हे तालुक्यातील भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या शेवते या दरम्यान तयार होणार आहे. या रस्त्याची एकूण लांबी 18 km एवढी राहणार आहे.
यापैकी तेरा किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच 2.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातं पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
आता उर्वरित 2.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी चार कोटी रुपयांची मागणी संशोधन आणि विकास विभागाकडे करण्यात आली आहे. आता याला देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे. म्हणून लवकरच हा संपूर्ण रस्ता तयार होईल आणि पुण्यासहित रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळेल अस सांगितलं जात आहे.