Pune Local Train : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असून याच उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत पुणे ते दौंड दरम्यान लोकल ट्रेन सुरू झाली आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. काल पहिल्यांदाच या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दौंडसह सोलापूर विभागातील बहुतांश परिसर पुणे विभागात समाविष्ट करण्यात आला आहे.
हेच कारण आहे की दौंडला उपनगराचा दर्जा मिळेल अशी आशा येथील प्रवाशांच्या माध्यमातून व्यक्त केली जात होती. तसेच उपनगराचा दर्जा मिळाल्यानंतर पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू होईल अशी देखील आशा या भागातील प्रवाशांच्या माध्यमातून व्यक्त केली जात होती.
विशेष म्हणजे या संदर्भात प्रवासी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा देखील सुरू आहे. मात्र अजून या पाठपुराव्याला यश आलेले नाही. अशातच मात्र या मार्गावर काल अर्थातच सोमवारी इलेक्ट्रिक लोकल चालवण्यात आली आहे.
या मार्गावर धावत असलेली डेमू ट्रेन दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असल्याने या मार्गावर ही इलेक्ट्रिक लोकल चालवली जात आहे. पण, या मार्गावर कालपासून सुरू झालेली ही इलेक्ट्रिक लोकल कायमस्वरूपी चालवली जाणार नसल्याचे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणजेच ही इलेक्ट्रिक लोकल या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. तात्पुरती का होईना पण या इलेक्ट्रिक लोकल मुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हा 12 डब्यांचा इलेक्ट्रिक लोकलचा रेक भुसावळ येथून मागवण्यात आला आहे.
जोपर्यंत या मार्गावर सुरू असलेले डेमू ट्रेन रिपेअर होत नाही तोपर्यंत ही इलेक्ट्रिक लोकल या मार्गावर सुरू राहणार आहे. जेव्हा पुणे ते दौंड दरम्यान सुरू असलेली डेमू ट्रेन दुरुस्त होईल तेव्हा कालपासून सुरू करण्यात आलेली ई-मेमू ट्रेन पुन्हा एकदा भुसावळला दिली जाणार आहे.
परंतु या मार्गावर सुरू करण्यात आलेली ही तात्पुरती इलेक्ट्रिक लोकल अशीच सुरू राहिली पाहिजे अशी इच्छा प्रवाशांची आहे. दरम्यान पुणे रेल्वे विभाग देखील हा इलेक्ट्रिक लोकलचा रेक पुण्यातच राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे.
विशेष बाब अशी की मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या माध्यमातून या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सुरू झाली पाहिजे यासाठी रेल्वे बोर्डाकडे मागणी करण्यात आली आहे. प्रवासी आणि प्रवासी संघटनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने रेल्वे बोर्डाकडे या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल चालवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
अद्याप मात्र बोर्डाकडून या मार्गावर लोकल चालवण्यास परवानगी मिळालेली नाही. परंतु प्रवाशांची मागणी पाहता आगामी काळात या मार्गावर देखील लोकल सुरू होऊ शकते अशी आशा साऱ्यांनाच आहे. यामुळे आता भविष्यात या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सुरू होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.