Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरात नव्याने मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहेत.
नुकतेच एक ऑगस्ट रोजी वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट पर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. अशातच आता पुणे शहरात आणखी काही मार्गावर मेट्रो सुरु करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाला मंजुरी देखील दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या नवीन मार्गासाठी महा मेट्रोने डीपीआर तयार केला होता.
तसेच हा डीपीआर महा मेट्रोच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला तसेच भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या सात कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
यामुळे आता या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या मार्गांना मंजुरी दिली असल्याने आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला जाणार आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा या चालू ऑगस्ट महिन्यात होणार असून या प्रस्तावाला या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणार आहे. तसेच सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला की याला केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर मग प्रत्यक्षात याचे बांधकाम सुरू होणार अशी माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण हे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेले मार्ग कसे राहणार, या मार्गाचा रूटमॅप कसा राहणार, यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसा असणार मार्ग किती खर्च होणार?
महामेट्रोने तयार केलेल्या डीपीआर नुसार वनाज ते चांदणी चौक हा 1.2 किलोमीटरचा मार्ग आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी असा 11.63 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून यासाठी 3609 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबतच खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा 25.86 किलोमीटरचा मार्ग आणि पौड फाटा-वारजे-माणिक बाग हा 6.11 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला असून यासाठी 9 हजार 74 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
केंद्र व राज्य सरकार उचलणार खर्चाचा भार
या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकार 20% आणि राज्य सरकार 20% निधी देणार आहे. तसेच उर्वरित 60% निधी हा कर्ज घेऊन उभा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कर्जाची हमी महामेट्रोने घेतली आहे. अर्थातच महामेट्रोला हे कर्ज उभारायचे आहे. तसेच या मार्गासाठी महापालिकेला केवळ भूसंपादनासाठी सात कोटी रुपयांचा खर्च करायचा आहे.