Pune Metro News : पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत आहे. खरंतर शहरात आत्तापर्यंत दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे.
या दोन्ही मार्गावरील मेट्रोने दिवसाला जवळपास 60 ते 65 हजार पुणेकर प्रवास करत आहेत. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुरक्षित आणि जलद झाला आहे. अशा या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या माध्यमातून मेट्रोचे पुढील टप्पे केव्हा सुरू होणार हा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान पुणेकरांना लवकरच एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हा मेट्रोमार्ग सुरू असून या मेट्रो मार्गाचा विस्तारित मार्ग अर्थातच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोबाबत नुकतीच एक महत्त्वाची अशी बैठक घेतली होती.
या बैठकीत हा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहेत. यासाठी या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोबाबत एक महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.
त्यांनी सांगितले की, मेट्रोच्या खडकवासला ते स्वारगेट प्रकल्पचा अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. आता त्यांनी स्वारगेट ते लोणी काळभोरपर्यंतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच याचा प्रकल्प अहवाल तयार करताना सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला ते लोणी काळभोरपर्यंत एकात्मिक रस्ते, उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद करावी लागू शकते असही सांगितलं आहे.
एवढेच नाही तर त्यांनी एका नवीन मेट्रो मार्गाची घोषणा देखील केली आहे. त्यांनी सोलापूर मार्गावरील मोठी वाहनसंख्या पाहता लोणी काळभोर ते उरुळी कांचन या दरम्यानही भविष्यात मेट्रोचा विचार करावा लागेल असे सांगितले आहे. म्हणजेच भविष्यात लोणी काळभोर ते उरळी कांचन दरम्यानही मेट्रो सुरु होऊ शकते असे संकेत आता मिळाले आहेत.