बंगालच्या खाडीत तीव्र झाले ‘हामून’ चक्रीवादळ ! ‘या’ राज्यात बरसणार मुसळधार वादळी पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyclone Hamoon Alert : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये तापमान वाढ पाहायला मिळाली आहे. तापमान वाढीमुळे वातावरणात उकाडा वाढला होता आणि यामुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडीशी कपात झाली आहे.

काही ठिकाणी थंडीची देखील चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.

अशातच अरबी समुद्रात तेज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळ तयार झाले आहे. 2018 नंतर प्रथमच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. यामुळे भारतीय हवामान खाते या दोन्ही चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने अरबी समुद्रात तयार झालेल्या त्याचे चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरात वर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे जाहीर केले आहे. गुजरातमध्ये आगामी पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.

बंगालच्या खाडीत तयार झालेले हामून चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सुमारास खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एवढेच नाही तर अतिवृष्टी झाल्यास सखल भागातील लोकांना बाहेर काढण्यास तयार राहण्याच्या देखील सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला प्रशासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिसा राज्यातील किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच IMD ने नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता यावेळी वर्तवली आहे.

दुसरीकडे हवामान खात्याने चक्रीवादळ तेज आज म्हणजे 24 ऑक्टोबरच्या सकाळी एक अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुढे हे वादळ येमेनमधील अल घायदा आणि ओमानमधील सलालाह दरम्यान येमेन-ओमान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

एकंदरीत बंगालच्या खाडीत तयार झालेल्या आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने यावेळी सांगितले आहे.

मात्र देशातील ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळणार आहे. यामुळे संबंधित राज्यातील नागरिकांनी अधिक सावधान आणि सतर्क राहणे अपेक्षित आहे.

Leave a Comment