Pune Mhada News : पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती छत्रपती संभाजी नगर अशा महानगरांमध्ये आता घर घेणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम बनले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत.
घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता काही सर्वसामान्यांना जीवाचा आटापिटा करूनही शहरी भागात घर घेता येणे शक्य होत नाहीये. यामुळे अनेकजण म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान, म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे म्हाडा पुणे मंडळांने 4,777 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील 4777 घरांसाठी आज अर्थातच 08 मार्च 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे मंडळांतर्गत म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही सोडत महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर एक मोठी भेट ठरणार आहे.
या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान आता आपण या सोडतीसंदर्भातली माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, या सोडतीसाठी कालपासून अर्थात सात मार्च 2024 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
तसेच आज अर्थातच आठ मार्च 2024 दुपारी तीन वाजेपासून या सोडतीमध्ये इच्छुक नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत राहणार आहे.
अर्ज कुठं करणार ?
या सोडतीसाठी इच्छुक नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर इच्छुक नागरिकांना आपले अर्ज सादर करता येणार आहेत.
तसेच, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी नागरिकांना lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येईल अशी माहिती समोर आली आहे.