Pune Mhada News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यात घराच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढत चाललेले औद्योगिकरण आणि शहरीकरण, इंधनाचे वाढत चाललेले दर, वाढती महागाई अशा विविध कारणांचा समावेश होतो.
यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे खूपच अवघड वाटू लागले आहे. घर घेण्यासाठी सर्वसामान्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्या स्वप्नाच्या घरांसाठी सर्वसामान्यांना म्हाडा आणि सिडकोच्या घरांचा मोठा आधार मिळतो.
म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे अनेकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. परिणामी, अनेक जण हक्काच्या घरांसाठी म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना पुणे मंडळांने नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. पुणे मंडळाने नुकतीच 2024 मधील घरांची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 4882 घरांसाठी म्हाडा पुणे मंडळांने ही सोडत जारी केली आहे.
दरम्यान या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे आहे हा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण पुणे मंडळाच्या या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे आहेत याची माहिती पाहणार आहोत.
सर्वात स्वस्त घर कुठं ?
या लॉटरीत पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान आवास योजना आणि शासकीय खाजगी भागीदारीतील सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनेच्या सदनिकांचा समावेश आहे. या लॉटरीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत देखील घरांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गतच सर्वात स्वस्त घर म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीत उपलब्ध झालेले आहे. ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यातील सर्वात स्वस्त घर सर्वे क्रमांक 1712 दिवे पुरंदर येथे आहेत. यात एकूण 17 घरे समाविष्ट आहेत. यातील घरांची किंमत नऊ लाख 44 हजार आठशे रुपये एवढी आहे. 29.40 चौरस मीटर एवढा या घरांचा कार्पेट एरिया आहे.
विशेष बाब अशी की याच योजनेअंतर्गत म्हाडा पुणे मंडळांने ईडब्ल्यूएस घटकासाठी सुद्धा सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. यात चाकण महाळुंगे इंगळे फेस 2 या ठिकाणी एकूण 32 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांची किंमत 13 लाख 61 हजार 895 रुपये एवढी ठरवण्यात आली आहे. या घरांचा कार्पेट एरिया 51.59 चौरस मीटर एवढा आहे.
याशिवाय पुणे मंडळाच्या या लॉटरीत 20 टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत येवलेवाडी येथे 12 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या घरांचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी.) 43.65 ते 49.49 इतके आहे. या घरांच्या किमती बाबत बोलायचं झालं तर यांच्या किंमती 13,94,400 ते 15,81000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
सद्गुरु रेसिडेन्सी, मे. मा. प्रणाम बिल्डकॉन प्रा. लि., स. नं. 2, हिस्सा नं. 4 /2/2, येवलेवाडी येथे ही घरे आहेत. ही घरे 1 बीएचके आहेत. निश्चितच म्हाडा पुणे मंडळांने सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे या सोडती मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.