Pune-Nashik Expressway : मुंबई-पुणे-नासिक हे महाराष्ट्राच्या विकासाचे सुवर्णं त्रिकोण आहे. यापैकी पुणे ते नाशिक या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. दैनंदिन कामानिमित्त व्यवसायानिमित्त आणि शिक्षणानिमित्त नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही थेट पुणे ते नाशिक अशा प्रवासासाठी रेल्वे मार्ग तयार झालेला नाहीये.
या मार्गावर नवीन सेमी हाय स्पीड रेल्वे प्रस्तावित करण्यात आली आहे. पण अजून या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाहीये. अशातच मात्र या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी एक नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. या नवीन औद्योगिक महामार्गामुळे दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. गेल्या वर्षी अर्थातच जून 2023 मध्ये हा नवीन महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
आता याच महामार्गासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय अनेक नवीन महामार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला असता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात 4217 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे तयार करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्गाचा देखील समावेश होतो. या महामार्गासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
दरम्यान या मार्गाच्या आराखड्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच या सल्लागाराने या महामार्गाचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला होता.आता या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता दिली आहे.
तसेच या मार्गाच्या बांधकामाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक परस्परांना जोडले जाणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा पाच तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवासाच्या कालावधीत तब्बल दोन तासांची बचत होणार आहे.
कसा राहणार रूट
हा मार्ग पुणे, अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या शहरांजवळून जाणार आहे. हा मार्ग राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहरांजवळून जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत पुणे ते शिर्डी साधारण लांबी १३५ किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) साधारण लांबी ६० किलोमीटर व सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक-निफाड राज्यमहार्गाचा भाग) लांबी १८ किलोमीटर एवढी राहणार आहे. म्हणजे एकूण २१३ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.