Pune News : माझं, तुमचं आपलं प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं. एक हक्काचं घर असावं जिथे आपलं सर्व आयुष्य मनमुरादपणे जगता यावं असे स्वप्न आपल्या उराशी बाळगून आपण अहोरात्र कष्ट करतो. मात्र, ही महागाई डायन आपल्यापैकी अनेकांच्या स्वप्नाच्या आड येत आहे. महागाईमुळे घराचे स्वप्न अनेकांना पूर्ण करता येत नाहीये. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
इंधनाच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. बिल्डिंग मटेरियलचे दर देखील गेल्या काही वर्षांमध्ये वधारले आहेत. यामुळे घर बांधणीचा खर्च हा आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा होऊ लागला आहे. परंतु आता सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. खरंतर घर बांधण्यासाठी विविध बिल्डिंग मटेरियलची आवश्यकता असते.
यात वाळू आणि सिमेंटवर मात्र सर्वाधिक खर्च होतो. परंतु शासनाने वाळूमाफियांना लगाम लावण्यासाठी नवीन वाळू धोरण राज्यात लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळणार आहे. साहजिकच वाळूच्या खर्चात बचत झाली तर घर बांधणी सर्वसामान्यांना परवडेल असा आशावाद व्यक्त होत आहे. शासनाने नव्या वाळू धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मात्र असे असले तरी अजून काही काळ शासनाचे हे वाळू धोरण पूर्णपणे लागू होणार नसल्याचे चित्र आहे. या नवीन धोरणाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणखी काही दिवस जाऊ द्यावे लागणार आहेत. तदनंतर मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला 600 रुपये प्रतिब्रास या दरात वाळू उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी वाळूचे डेपो तयार केले जाणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातही ठीक-ठिकाणी डेपोची निर्मिती केली जाणार आहे.
अशातच एक महत्त्वाची माहिती पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाळू डेपो सुरू झाला आहे. शिरूर प्रमाणेच जिल्ह्यातील इतरही तालुक्यात वाळू डेपो सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान, आज आपण पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी वाळू डेपो सुरू होणार आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
जिल्ह्यात कुठे-कुठे सुरू होणार वाळू डेपो?
मिळालेल्या माहितीनुसार, हवेली आणि आंबेगाव तालुक्यात प्रत्येकी सहा डेपो सुरू होणार आहेत, दौंड तालुक्यात पाच डेपो सुरू होणार आहेत, बारामती, शिरूर आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन, पुरंदर तालुक्यात सात आणि खेड तालुक्यात एक डेपो सुरू होणार आहे. यापैकी शिरूर तालुक्यात एक डेपो सुरू करण्यात आली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
तसेच इतर वाळू डेपोंसाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की, लवकरच हे सर्व डेपो कार्यान्वित होणार आहेत. पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यात वाळू डेपो सुरू होत आहेत. पण पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालय हद्दीत वाळू उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी वाळू डेपो सुरू होणार नसल्याचे सांगितले जात आहे.