Pune News : राज्य शासन राज्यातील गरजू लोकांच्या हितासाठी विविध निर्णय घेत असते. यामध्ये राज्यातील गरीब लोकांसाठी घरकुलाची योजना देखील सरकारने सुरू केली आहे. तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांसाठी शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून काही झोपडपट्टी धारकांना निशुल्क घरे उपलब्ध होत आहेत तर काही झोपडपट्टी धारकांना सशुल्क घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.
आता नुकताच राज्य शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता मुंबई प्रमाणेच पुण्यातील झोपडी धारकांना देखील निशुल्क आणि सशुल्क घरे उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील सन 2000 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना निशुल्क घरे उपलब्ध होणार असून 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना अडीच लाखात घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अपात्र झोपडीधारकांना देखील त्याच ठिकाणी घरे मिळणार आहेत.
यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्यंतरी शासनाच्या माध्यमातून २००० नंतरच्या आणि २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांत घरे उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा निर्णय केवळ मुंबई पुरता लागू करण्यात आला होता. यामुळे हा निर्णय पुण्यातही लागू व्हावा अशी मागणी होती. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सुधारित बांधकाम नियमावली राज्य शासनाकडे पाठवली होती.
आता राज्य शासनाने यास मान्यता दिली आहे. यामुळे आता पुण्यातील झोपडीपट्टी धारकांना देखील याचा फायदा होणार आहे. खरंतर पुण्यातील 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडीपट्टी धारकांना यापूर्वी बांधकाम खर्चाच्या दराने घरे उपलब्ध करून दिली जात होती. मात्र बांधकामाचा खर्च देखील सात ते आठ लाख रुपयांपर्यंत जात. यामुळे याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.
अशा परिस्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना अडीच लाखात या लोकांना घरे उपलब्ध करून देण्याची शिफारस शासनाकडे केली होती. याला आता शासनाने हिरवा कंदील दाखवला असून या संबंधित झोपडपट्टी धारकांना अडीच लाखात घर उपलब्ध होणार आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना 2011 पूर्वी ते त्या ठिकाणी रहिवासी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.