Pune News : पुणे शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही दशकात झपाट्याने विकास झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्याती प्राप्त पुणे शहरात अलीकडे मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे आता पुणे शहराची आयटी हब म्हणून ओळख होऊ लागली आहे. साहजिकच विकासाची ही गंगा वेगवेगळी आव्हाने देखील घेऊन येत आहे.
यामध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत ठेवण्याचे आव्हान शासनाच्या पुढ्यात राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
तसेच पुणे सोलापूर या मार्गावर चार पदरी दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. पुढील 25 वर्षांसाठी वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन या मार्गावर हा उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग बनवला जाणार आहे. दरम्यान, या पुणे-सोलापूर मार्गावर तयार होणाऱ्या चार पदरी दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रोमार्ग संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर या महामार्गावर भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी मार्गावर हा दोन मजली उड्डाणपूल तयार होणार आहे. हा पूल हडपसर (रविदर्शन) ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) यादरम्यान विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपुल विकसित होणार आहे.
या प्रकल्पाचा अंतिम आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हा प्रकल्प आराखडा मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठीही पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाने याला अंतिम मान्यता दिली की या प्रकल्पाचे पुढील काम जलद गतीने होणार आहे.
पुणे-अहमदनगर मार्गावरही तयार होणार दुमजली उड्डाणपूल
पुणे – सोलापूर महामार्गाप्रमाणेच पुणे-नगर मार्गावरही चंदननगर ते शिक्रापूर यादरम्यान मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पालाही मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने आता या प्रकल्पाचे काम पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे.
खरंतर पुणे-सोलापूर आणि पुणे-अहमदनगर या मार्गावर भविष्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हे दोन्ही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता या दोन्ही प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.