Pune News : पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाऊल ऑटोमॅटिक कोकणाच्या दिशेने वळतात. कोकणात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी राहते. पुण्याहून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात जातात. याच पर्यटकांसाठी आणि पुण्याहून कोकणात आणि कोकणातून पुण्याकडे तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे रायगड प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणासाठी भोरहुन महाडकडे जाणारा वरंध घाट जवळपास तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, एक जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत हा घाट अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसेस, मोठे ट्रक आणि इतर सहा चाकी प्रायव्हेट वाहनांना या घाटमार्गे प्रवास करता येणार नाही. निश्चितच याचा फटका या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
खरंतर पावसाळ्यात घाटातील प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीने घाट सेक्शन मध्ये अनेक दुरुस्तीची कामे करण्यात आलीत. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. मात्र रायगड प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा हा घाट प्रवासासाठी पावसाळ्यात असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष बाब म्हणजे भोरचे प्रांताधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार भोरकडूनही हा घाट बंद केला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्रांत अधिकारी प्रस्ताव पाठवणार आहेत. वास्तविक गेल्यावर्षी पावसाळ्यात या घाट सेक्शनमध्ये दरड कोसळणे, माती कोसळणे, रस्ता खचणे यांसारख्या अनेक घटना घडल्यात.
यामुळे या घटना यंदाच्या पावसाळ्यात निर्माण होऊ नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आणि घाट सेक्शन मध्ये दुरुस्तीची कामे केलीत. महाड व भोर तालुक्यात ही दुरुस्तीची कामे करण्यात आली.
मात्र, हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात यंदाही अतिवृष्टी होणार असा अंदाज व्यक्त केला. या अनुषंगाने संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून घाट सेक्शनची पाहणी करण्यात आली. यानंतर वरंध घाट रायगड जिल्हा प्रशासनाकडून तब्बल तीन महिने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता हा घाट बंद राहणार असल्याने कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कोकणातून कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून प्रवाशांना करण्यात आले आहे.