Pune News : शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातनाम असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. शहरातील नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतूकीला पसंती दाखवावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे देखील वेगाने विकसित केले जात आहे.
नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी, नागरिकांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा तसेच शहरातील प्रदूषण नियंत्रणात राहावे यासाठी मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. आता मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गेल्या वर्षी पुणे मेट्रोने आपले कार्य सुरू केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वप्रथम पुण्यात मेट्रो सुरु झाली.
सुरुवातीला, मेट्रो PCMC आणि फुगेवाडी दरम्यान चालवली गेली, ज्यामुळे रहिवाशांच्या प्रवासाच्या पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात सुरू झालेल्या मेट्रो मार्गाला पुणेकरांनी अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नव्हता. यामुळे पुणे मेट्रो फेल होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विस्तारित मेट्रो मार्गांना पुणेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे.
पीसीएमसी आणि फुगेवाडी दरम्यान चालवली जाणारी मेट्रोसेवा एक ऑगस्ट रोजी दिवाणी न्यायालयापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मेट्रो मार्गांवर मेट्रो सुरु करण्यात आले आहे. या मेट्रो मार्गांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान या दोन्ही मेट्रो मार्गांना पुणेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. दिवसाला जवळपास 60 ते 65 हजार प्रवासी मेट्रो मधून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
महामेट्रोच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गाचा स्वारगेटपर्यंत विस्तार केला जाणार आहे. यासोबतच, वनाज ते रुबी हॉल क्लिनिक मेट्रो मार्गाचा रामवाडीपर्यंत विस्तार केला जाणार आहे. अशातच या दोन्ही मेट्रोमार्गाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोमार्ग डिसेंबर 2023 च्या अखेरीस प्रवासी सेवेसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन मार्च 2024 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. निश्चितच, हे दोन्ही विस्तारित मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.