Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यात एका आजाराची साथ बळावत चालली आहे. या साथीच्या आजारामुळे जिल्ह्यात सध्या चिंतेचे ढग आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
या आजारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. खरंतर जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांच्या आजाराची साथ सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवाची आळंदी येथील वारकरी मुलांमध्ये डोळे येण्याची साथ पाहायला मिळाली आहे. या साथीने ग्रसित झालेल्या मुलांचे डोळ्यांचे बुबूळांना खूप त्रास होतोय.
अवघ्या चार दिवसात आळंदी येथे 1560 शाळकरी मुलांचे डोळे आले आहेत. ही साथ वेगाने पसरत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या माहितीस्तव सांगू इच्छितो की, सोमवारी 450, मंगळवारी 740, बुधवारी 210 आणि गुरुवारी 160 मुलांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
देवाच्या आळंदीत शाळकरी मुलांमध्ये वेगाने पसरत असलेल्या या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच NIV चे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक घटनास्थळी गेले आहेत. आळंदी नगरपालिकेत या आजाराच्या उद्रेकामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड आणि लगतच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये देखील या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्र तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोळे आलेल्या शाळकरी मुलांवर मोफत उपचार केले जात आहेत.
दरम्यान या रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या साथीच्या आजारामुळे सध्या पुणे जिल्ह्यासह सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पालकांमध्ये आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.