Pune Property News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरालगत वसलेले पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण आणि शहरीकरण झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाला देखील मोठी चालना मिळाली आहे.
हिंजवडी परिसर तर आयटी हब म्हणून नावारूपाला आला आहे. एकूणच काय की पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवड शहर देखील झपाट्याने विकसित होत आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपूर्वी मोशी आणि चिखली परिसर शहरातील इतर भागांच्या तुलनेत कमी विकसित होता. हा परिसर अगदी गाव-खेड्यासारखा होता.
परंतु आता या परिसराचा देखील वेगाने विकास होत आहे. या भागात आता अलीकडील काही वर्षात मोठमोठ्या गृहप्रकल्पांची कामे झाली आहेत. शहरीकरण वाढत आहे. या ठिकाणी आता शॉपिंग मॉल, उच्चभ्रू सोसायट्या विकसित झाल्या आहेत. यामुळे हा भाग देखील आता चांगलाच गजबजू लागला आहे.
विशेष म्हणजे या परिसरात आता वेगवेगळे शासकीय कार्यालये देखील उभारले जाऊ लागले आहेत. या परिसराचा वेगाने विकास झाला असल्याने आता या ठिकाणी वास्तव्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात गृह खरेदी होत आहे. नागरिकांचा कल आता या परिसराकडे वाढू लागला आहे.
या कारणामुळे वाढतोय गृह खरेदीचा कल
चिखली, मोशी परिसरात आता गृह खरेदी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या परिसरातून अगदी सहजतेने शहरात प्रवेश करता येतो. शहरात जाण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेचे चहोली व बो-हाडेवाडी मोशी येथील गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहेत.
यामुळे या भागात आगामी काळात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढणार आहे. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिकांना जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे, शिवाय स्थानिक मंडई सुद्धा आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना ताजा भाजीपाला मिळू लागला आहे.
या परिसरात विविध देवी देवतांची मंदिरे आहेत. या भागाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारक देखील तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. चिखलीत पीसीओई अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे.
चिखलीत सत्र न्यायालय संकुल आणि न्यायाधीश निवासस्थाने सुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी जागा निश्चित झाली आहे. मोशी, चिखली, तळवडे, च-होलीसाठी महापालिका स्वतंत्र अग्निशामक केंद्र देखील सुरू केले आहे. विशेष म्हणजे मोशी मध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय देखील तयार केले जाणार आहे.
यासाठी 450 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून 15 एकरात हे रुग्णालय उभे राहणार आहे. हेच कारण आहे की या परिसरात आता मोठ्या प्रमाणात गृह खरेदी केली जात आहे. हा परिसर आता नागरिकांच्या पसंतीस खरा उतरू लागला आहे. यामुळे एकेकाळी मागास असलेला हा भाग आता वेगाने विकसित होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या भागात 1 आरके घरांच्या किमती 20 ते 25 लाखांच्या घरात आहेत. तसेच वन बीएचके 35 ते 45 लाख, टू बीएचके 45 ते 70 लाख, थ्री बीएचके 70 लाख ते एक कोटी यादरम्यान उपलब्ध आहेत. या परिसरात फोर बीएचके घरांसाठी एक कोटीपेक्षा अधिक आणि रो हाऊससाठी एक कोटी ते दीड कोटी पेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत आहे.