Pune Railway News : पुणेकरांना गेल्या महिन्यात दोन मेट्रो मार्गांची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांना या मेट्रो मार्गाचा खूपच फायदा होत आहे. नागरिकांनी या मेट्रोला चांगली पसंती देखील दाखवली आहे. हेच कारण आहे की, पुणे मेट्रोचा विस्तार आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे.
अशातच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता नवीन रेल्वे मार्ग तयार होणार आहे. खरंतर हा नवीन रेल्वे मार्ग गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडला आहे. भूसंपादनामुळे हा मार्ग जवळपास अडीच दशकांपासून रखडला आहे.
पण आता या रेल्वे मार्गासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज आपण हा नवीन रेल्वे मार्ग जिल्ह्यातील कोणत्या भागाला कनेक्ट करणार आहे, याचा रूटमॅप कसा राहील याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असेल नवीन रेल्वे मार्ग
बारामती-फलटण-लोणंद असा हा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. वास्तविक, या रेल्वे मार्गला 1997-98 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्याच्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामाला अपेक्षित अशी गती मिळाली नाही. जवळपास 25 वर्षांपासून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित असतानाही पूर्ण झालेला नाही.
म्हणजेच आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसेल तेव्हा या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र केंद्राची मंजुरी असतानाही हा मार्ग भूसंपादनामुळे रखडला होता. सध्या स्थितीला या मार्गाचा फलटण ते लोणंद हा टप्पा पूर्ण झाला आहे. पण बारामती ते फलटण हा टप्पा पूर्ण झालेला नाही.
मात्र या टप्प्याचे 78% भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान या रेल्वेमार्गासाठी सहाशे कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन वर्षात म्हणजेच डिसेंबर 2025 पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बांधून प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती-फलटण-लोणंद मार्गापैकी फलटण ते लोणंद हे काम पूर्ण झाले आहे. आता बारामती ते फलटण हे 37 किलोमीटरचे कामदेखील युद्ध पातळीवर सुरू केल जाणार आहे. या मार्गावर चार मोठे पूल राहणार आहेत. यात 26 मेजर पूल, 23 मायनर पूल आणि 7 आरओबी विकसित केले जातील.
या रेल्वे मार्गावर न्यू बारामती, माळवाडी आणि ढाकाळे ही नवीन रेल्वे स्थानके उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच या रेल्वे मार्गामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची दळणवळण व्यवस्था सक्षम येणार आहे. यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.