Pune Ring Road : पुणे आणि वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड या दोन शहरात वाहतूक कोंडीची समस्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. विशेष बाब म्हणजे आगामी काही वर्षात ही वाहतूक कोंडी आणखीनच वाढणार आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
आता याच रिंग रोड संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने इच्छुक कॉन्ट्रॅक्टरकडून पात्रता विनंतीसाठी अर्ज मागवले होते. आता याचबाबत एक अपडेट हाती आली आहे.
आतापर्यंत देशातील प्रमुख 28 कॉन्ट्रॅक्टर्सनी यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये L&T, GR Infraprojects, Afcons Infra, IRB इन्फ्रास्ट्रक्चर आणि IRCON इंटरनॅशनल यांसारख्या मेगा कंपनीचा समावेश आहे. अर्थातच या कंपन्या आता पुणे रिंग रोडच्या निविदेसाठी बोली लावणार आहेत.
कसा आहे प्रकल्प
पुणे रिंग रोड हा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. हा मार्ग एकूण दोन टप्प्यात विभागला आहे. याचे पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड असे दोन भाग राहणार आहेत. यात यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील उर्से ते पुणे – सातारा NH- 4 वरील शिवरेपर्यंतचा 74.08 किमी लांबीचा हा भाग पूर्व रिंग रोड म्हणून ओळखला जाणार आहे.
तसेच शिवरे ते पुणे जिल्ह्यातील उर्से असा 65.45 किमी लांबीचा रिंग रोड हा पश्चिम रिंग रोड म्हणून ओळखला जाणार आहे. या रिंग रोडसाठी जवळपास 659 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. खरंतर, या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या बहुतांशी गावामध्ये जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
आता ज्या गावातील मूल्यांकन पूर्ण झाले आहे म्हणजेच दर निश्चिती झाली आहे त्या गावातील बाधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्याकडून संमती पत्र घेतले जाणार आहे आणि त्यांना त्यांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली जाणार आहे. विशेष म्हणजे भूसंपादनात निधीची कमतरता भासू नये यासाठी हुडकोकडून 3500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
शिवाय आता जमीन मूल्यांकनाचे काम देखील पूर्ण झाले असल्याने येत्या महिन्याभरात जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 80% जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. साधारणता डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने आखले आहे.
रिंगरोडची वैशिष्ट्ये थोडक्यात
हा रिंग रोड वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहे. पुण्यात तयार होणारा हा रिंग रोड केवळ पुण्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी आणि पुणे ग्रामीण साठी अति महत्त्वाचा आहे. या रस्त्याची रुंदी ही 90 ते 110 मीटर राहणार आहे. म्हणजे काही भागात 90 मीटरतर काही भागात 110 मीटर एवढी रुंदी या रिंग रोडची राहील. या रिंग रोडची आणखी एक विशेषता म्हणजे काही भागात हा रिंग रोड सहा पदरी राहील तर काही भागात हा रिंग रोड आठ पदरी राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 97 किलोमीटर लांबीचा रिंग रोड हा सहा पदरी राहणार आहे तर 39 किलोमीटर लांबीचा रिंग रोड हा आठ पदरी राहणार आहे. या रस्त्यावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या प्रकल्पात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम देखील राहणार आहे.
या रस्त्यावर 14 इंटरचेंज, आठ पादचारी अंडरपास, सहा लहान वाहनांचे अंडरपास, 13 हलके वाहन अंडरपास, 37 वाहनांचे अंडरपास, 28 वाहनांचे ओव्हरपास, तीन रेल्वे ओव्हर ब्रीज, 16 मोठे पूल, 38 छोटे पूल, 230 कल्व्हर्ट, 180 टनेल आणि 230 ओव्हर टनेल बनवल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 18,857 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 30 महिन्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या रिंग रोडचे बांधकाम हे एकूण 9 टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 11,000 कोटी रुपये राज्य शासनाने देऊ केले आहेत.
जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी तर फोड येईलच मात्र यासोबतच महाराष्ट्राचा एकात्मिक विकास देखील हा प्रकल्प सुनिश्चित करण्याचे काम करेल असे मत काही तज्ञांनी या निमित्ताने व्यक्त केले आहे.