Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूसंपादन सुरू आहे.
खरे तर या प्रकल्पांतर्गत 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड विकसित होत आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. यामध्ये पश्चिम भागातील 34 गावांपैकी 31 गावांमधील भूसंपादन पूर्ण झाले आहे.
तसेच संबंधित शेतकऱ्यांना 2975 कोटी रुपयांचा मोबदला देखील वितरित करण्यात आला आहे. पश्चिम भागातील भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने सध्या या गावातील जमीन मूल्यांकनाचे आणि दर निश्चितीचे काम सुरू आहे.
दरम्यान, पूर्व मार्गावर मावळातील ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांमध्ये या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील जमिनीसाठी कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावांतील शेतकऱ्यांना नोटीस पाठविली गेली आहे. खेडमधील स्थानिकांनी भूसंपादनाबाबत मुदतवाढीनुसार एक महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्यास सुरुवात केली आहे.
उर्वरित मावळ तालुक्यातील ११ आणि हवेली तालुक्यातील १५ गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश या वेळी देण्यात आला आहे. एकंदरीत पूर्व भागातील भूसंपादनाचे काम देखील आता युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.
मात्र असे असले तरी अनेकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी येत्या काही दिवसात आचारसंहिता सुरू होणार असल्याने आचारसंहिता काळात प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम सुरू राहणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. खरंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार आहे.
दरम्यान या आचारसंहिता कालावधीत देखील पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूसंपादन सुरूच राहणार आहे. आचारसंहिता काळातही भूसंपादन सुरू ठेवा असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. त्यामुळे पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.