Pune Ring Road News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे.
यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडीची ही समस्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. हेच कारण आहे की पुणे शहरात येणारी वाहतूक बाहेरून वळवण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन रिंग रोड तयार केले जाणार आहेत. एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एक रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे.
दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड साठी दाखल झालेल्या निविदा उघडण्यात आल्या आहेत.
यात प्रकल्पाच्या नऊ पॅकेजच्या कामासाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या आहेत. यामुळे आता या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुणे रिंग रोडचे बांधकाम जून 2024 पासून सुरु होऊ शकते.
म्हणजेच येत्या महिन्यात या प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ होणार असा अंदाज आहे. मेघा इंजीनियरिंगने 3 आणि नवयुग इंजीनियरिंगने 3 पॅकेजसाठी सर्वात कमी रकमेच्या निविदा भरल्या आहेत.
तसेच उर्वरित तीन पॅकेजसाठी पीएमसी इन्फ्रा, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा आणि जीआर इन्फ्रा या कंपनीने सर्वात कमी रकमेच्या निविदा भरल्या आहेत. पुणे रिंग रोडचे 127 km लांबीचे आणि 110 मीटर रुंदीचे कामासाठी या निविदा सादर झाल्या आहेत.
या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात काम होणार आहे. पश्चिम भागाचे पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व भागाचे चार पॅकेज मध्ये काम केले जाणार आहे.
या कामासाठी कंपन्यांनी निविदा भरल्या असून या निविदा उघडल्या गेल्या आहेत यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे. कंत्राटदार नियुक्त झाल्यानंतर मग या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकणार आहे.
निश्चितच या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटणार असा दावा केला जात असल्याने हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे.