Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
जर समजा शेती मधून चांगले उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. कित्येकदा पिकासाठी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही. गेल्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाबाबत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे.
महिन्याभरापूर्वी कांद्याला देखील खूपच कमी दर मिळत होता. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले होते. मात्र जर शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या शेतमालाला चांगला दर मिळाला तर काय होऊ शकते, जर योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना कोणत्याही मदतीची गरज नाही हे सध्या पाहायला मिळत आहे.
सध्या बाजारात टोमॅटो या भाजीपाला पिकाला चांगला विक्रमी दर मिळत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. अनेक शेतकऱ्यांना तर या पिकातून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या मौजे पाचघर येथील एका शेतकरी दांपत्याने 12 एकर टोमॅटो लागवडीतून तब्बल दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
योग्य नियोजनामुळे टोमॅटोचे विक्रमी उत्पादन मिळाले आणि बाजारात उत्पादित झालेल्या टोमॅटोला विक्रमी दर मिळाला असल्याने या शेतकरी दांपत्याने चक्क दोन कोटींचे उत्पन्न मिळवला असून त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी ही किमया साधली आहे.
या शेतकरी दांपत्याला 12 एकर टोमॅटो पिकातून मात्र दोन महिन्यात दोन कोटी तीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गायकर पती-पत्नीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटो या भाजीपाला पिकाची शेती करत आहेत. ईश्वर शेतीसाठी लागणारा सर्व कच्चामाल आणि साधनसामग्री पुरवतात.
तसेच सोनाली मजुरांच्या साह्याने शेती करतात. या चालू वर्षी या शेतकरी दांपत्याने एप्रिल महिन्यात टोमॅटो पिकाची लागवड केली. त्यांनी त्यांच्या बारा एकर जमिनीत सिजेंटा 6242 या टोमॅटो रोपांची लागवड केली. बारा एकरात जवळपास 60000 टोमॅटोची रोपे लावलीत.
टोमॅटो लागवड केल्यानंतर सुयोग्य नियोजन केले, खत, औषध दिले आणि वेळेवर कीटकनाशकांची फवारणी केली. टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. मांडव पद्धतीने टोमॅटोची लागवड केली. या बारा एकर क्षेत्रासाठी त्यांना जवळपास 40 लाख रुपयांचा खर्च आला.
आतापर्यंत त्यांना टोमॅटो पिकातून 15 तोडी मिळाली असून यातून पंधरा हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. या 15000 कॅरेट टोमॅटो उत्पादनातून त्यांना दोन कोटी तीस लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखी सहा ते सात हजार कॅरेट टोमॅटोचा माल शिल्लक आहे.
आतापर्यंत काढणी झालेल्या मालाला हायेस्ट 2311 रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळाला आहे. तसेच किमान भाव 660 रुपये प्रति कॅरेट असा नमूद करण्यात आला आहे. निश्चितच बारा एकर टोमॅटो पिकातून कोट्यावधींची कमाई करत या युवा शेतकरी दांपत्याने इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.