Pune To Kolhapur Railway : पुणे आणि कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहर आहेत. शिक्षणाचे माहेरघर पुणे ते करवीर निवासिनी अंबाबाईची नगरीं कोल्हापूर दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान, पुणे ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.
खरंतर, पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. यामुळे साहजिकच रेल्वेत गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे ते कोल्हापूर हा आधीच व्यस्त मार्ग आहे. या मार्गावर कमी रेल्वे गाड्या आहेत यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. सणासुदीमध्ये ही गर्दी आणखी वाढेल आणि परिणामी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, प्रवाशांची ही चडचण सोडवण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने पुणे ते कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान तब्बल 114 विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत. म्हणजेच पुणे ते कोल्हापूर 57 फेऱ्या आणि कोल्हापूर ते पुणे 57 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दररोज ही गाडी चालवली जाणार आहे.
कसं असेल वेळापत्रक
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत दररोज कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून रात्री साडेअकरा वाजता ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता पुण्याला पोहोचेल. तसेच पुणे-कोल्हापूर ही एक्सप्रेस 6 नोव्हेंबर ते एक जानेवारीपर्यंत रात्री पावणेदहा वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणिदुसऱ्या दिवशी 5:40 वाजता पोहोचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी कोल्हापूर, वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी आणि सासवड रोड, पुणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.