Pune Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2024 ला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. या 10 गाड्यांमध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. खरेतर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे. ही गाडी अहमदाबाद मार्गेच धावत आहे.
मात्र असे असले तरी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या गाडीमुळे मुंबईहून गुजरातला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच अहमदाबादहुन मुंबईकडे येणाऱ्यांना देखील या ट्रेनचा लाभ मिळणार आहे. सध्या स्थितीला आपल्या महाराष्ट्रातून आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या 8 मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घोरपडीत कोचिंग मेन्टेनन्स डेपो बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे.
काम पूर्ण होण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. या डेपोसाठी जवळपास 79 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेसच्या रेकची देखभाल होऊ शकणार नाही.
सध्या स्थितीला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात वाडी बंदर येथे असा डेपो तयार करण्यात आला आहे. आता मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागात घोरपडीत कोचिंग मेन्टेनन्स डेपो विकसित केला जाणार आहे. मध्य रेल्वेचा हा दुसरा डेपो राहणार आहे.
विशेष म्हणजे पुणे विभागात हा वंदे भारत एक्सप्रेसचा कोचिंग मेंटेनन्स डेपो विकसित झाला की मग पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी बातमी समोर येत आहे. सध्या मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी गाडी पुणे मार्गे धावत आहे.
या गाडीची देखभाल ही मुंबई विभागातील वाडी बंदर या डेपोमध्ये होते. आता मात्र पुणे विभागातच असा डेपो विकसित होणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, अद्याप पुणे विभागाची एकही वंदे भारत सुरु झालेली नाही.
ती सुरु होण्यासाठी कोचिंग डेपो बांधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान हा डेपो बांधण्यासाठी आता हालचाली वाढल्या आहेत. येत्या वर्षभरात हा डेपो बांधून तयार होईल.
त्यानंतर मग पुणे – सिकंदराबाद, पुणे-बडोदा या दोन मार्गांवर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या चार ते पाच महिन्यात याबाबत निर्णय होऊ शकतो असा दावा होत आहे. मात्र सद्यस्थितीला रेल्वे बोर्डाने या दोन वंदे भारत एक्सप्रेस बाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.