Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी खूपच मोलाचे आणि कामाची माहिती दिली आहे. त्यांनी पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. पंजाब डख यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
ते म्हटले की, बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळ तयार होत असून हे वादळ छत्तीसगड, मध्य प्रदेश मार्गे विदर्भ अन उत्तर महाराष्ट्रात येणार आहे. याच हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाची शक्यता तयार होत आहे. राज्यात 24 सप्टेंबर पासून ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. 24 ते 28 तारखे दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही मात्र भाग बदलत पाऊस पडत राहील असे त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे. खरंतर गेल्या दिड महिन्यांपासून मोसमी पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत होते. मध्यंतरी अर्थातच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काही दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस झाला मात्र त्या कालावधीत राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी लागली नाही.
यामुळे महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. पण आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
नागपूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, बीड यांसारख्या विविध जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग होत आहे. आज देखील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची हजेरी लागली आहे.
नागपूर मध्ये देखील आज चांगला मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच 28 सप्टेंबर पर्यंत पंजाबरावांनी राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट या पावसाने भरून निघेल असे आता शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देखील पंजाबरावांनी पाऊस होणार अंदाज व्यक्त केला आहे. पाच ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून पुढल्या महिन्यात राज्यातील विविध भागात अतिवृष्टीची शक्यता देखील पंजाब रावांनी वर्तवली आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.