Rabbit Farming In Marathi : आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे.
या व्यवसायावर देशातील जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्या डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट अवलंबून आहे. शेती सोबतच आपल्या देशात पशुपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायात गायींचे आणि म्हशीचे संगोपन आपल्या देशात सर्वाधिक केले जाते.
यासोबतच बकरी पालन, वराह पालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. अलीकडे ससे पालन हा व्यवसाय देखील विशेष लोकप्रिय बनला आहे.
आज आपण ससे पालन या व्यवसायाबाबतच सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ससे पालन व्यवसाय कुठे सुरू केला पाहिजे, या व्यवसायातील आव्हाने नेमकी काय? याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
ससे पालन व्यवसाय कसा सुरू करायचा
ससे पालन हा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू केला पाहिजे जिथे वायू आणि ध्वनी प्रदूषण खूपच नगण्य असते. वायू आणि दोन्ही प्रदूषणाच्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला तर नुकसान होऊ शकते. कारण की ससा हा असा प्राणी आहे ज्याला शांतता आणि स्वच्छ वातावरण मानवते.
या सोबतच ज्या ठिकाणी 25°c एवढे तापमान असते आणि जिथे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो त्या ठिकाणी हा व्यवसाय केला पाहिजे. अशा ठिकाणी ससे पालन सुरू केले तर हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचारात असाल तर आपण 10 मादी ससे आणि 2 नर सशांसह हा व्यवसाय सुरू करू शकता. पण जर तुम्हाला या व्यवसायातून चांगला नफा मिळवायचा असेल तर किमान 100 ससे घेऊन हा व्यवसाय सुरु केला पाहिजे.
सशाच्या प्रगत जाती कोणत्या?
ससे पालन करणारे शेतकरी विविध जातींचे संगोपन करतात. पण आपल्या देशातील हवामान हे पांढरा ससा, तपकिरी ससा, फ्लेमिश, न्यूझीलंड पांढरा, न्यूझीलंड लाल, कॅलिफोर्निया ससा, डच ससा, सोव्हिएत, चिंचिला ससा या जातीसाठी विशेष अनुकूल असल्याचे आढळून आले आहे. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर यापैकी कोणत्याही जातीचे संगोपन तुम्ही करू शकता.
कसं असावं आहार व्यवस्थापन
ससा हा एक खूपच छोटा आणि नाजूक प्राणी आहे. ससा हा पूर्णपणे शाकाहारी असतो. या व्यवसायातून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर सशांचा आहार हा योग्य आणि संतुलित असणे आवश्यक आहे. सशाला हिरवे गवत, हिरवी मोहरी आणि हिरव्या पालेभाज्या चारा, खाद्य म्हणून दिल्या पाहिजेत.
आपण त्यांना फळे देखील खाऊ घालू शकता. पण सशाला प्रदूषित, खराब अन्न देऊ नका. धान्याचे मिश्रण ससाला फक्त सकाळी आणि संध्याकाळी द्यावे आणि हिरवा चारा संध्याकाळनंतरच द्यावा, असे तज्ञांनी सुचवले आहे.
ससा पालन करतांना या गोष्टींची काळजी घ्या
ससा पालनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी सशांसाठी निवारा बनवण्यात आला आहे तिथे हवा आणि प्रकाशाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
गर्भवती ससे आणि तरुण सशाची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
10 मादी सशांसोबत एक नर ससा ठेवा, जेणेकरून सशांची पैदास योग्य पद्धतीने वाढेल.
ससा ज्या पिंजऱ्यात ठेवला आहे ते पिंजरे नेहमी स्वच्छ ठेवाववेत. ससा अस्वच्छ ठिकाणी चांगले वाढत नाहीत.
उन्हाळ्यात सशाचा पिंजरा थंड ठेवा, पाणी फवारणी करत रहा.
ससे आजारी पडल्यास पशुवैद्यकाशी त्वरित संपर्क साधावा.
ससे पालन व्यवसायासाठी किती खर्च करावा लागेल
जर तुम्ही शंभर सशांसोबत हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला ससे खरेदी करण्यासाठी दोन लाखांची गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय पिंजरा आणि आहार व्यवस्थापनासाठी आणखी एक लाखांपर्यंतची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. म्हणजेच 100 सश्यांचा हा संपूर्ण व्यवसाय तीन लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही सुरू करू शकता.