Ration Card News : नुकताच केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशनिंगची योजना पुढील पाच वर्षे अविरतपणे सुरू राहील असा निर्णय घेतला आहे. खरे तर कोरोना काळापासून केंद्र शासनाने मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.
याचा देशभरातील 81 कोटी लोकांना फायदा होत आहे. दरम्यान ही योजना 31 डिसेंबर 2023 ला बंद होणार होती. मात्र या योजनेला आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय मोदी मंत्रिमंडळाने घेतला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. अशातच मात्र राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक जानेवारीपासून आता राज्यातील रेशन दुकानदार रेशन वाटप करणार नाहीत.
स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने त्यांच्या काही प्रलंबित मागण्या सरकार मान्य करत नसल्याने एक जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नवीन वर्षात अगदी सुरवातीलाचं सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया फेयर प्राईस डीलर फेडरेशन तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाने रेशन दुकानदाराच्या काही प्रलंबित मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार आज १ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी समस्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
एवढेच नाही तर आजच्या आंदोलनानंतरही सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे.
राज्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह संपूर्ण देशभरात 1 जानेवारीपासून रेशन दुकान बंद राहणार आहे. म्हणजेच नागरिकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जाणार नाही.
जोपर्यंत सरकार रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही तोपर्यंत रेशनचे दुकान बंदच राहील असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे आता यावर सरकार काय तोडगा काढते, रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य होतात का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.