Sleeper Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. तेव्हापासून ही ट्रेन रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. आता या गाड्या सुरू होऊन पाच वर्षांहून अधिकचा काळ उलटला आहे.
आतापर्यंत जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत गाड्या सुरु झाल्या आहेत. सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. वंदे भारत ट्रेन्स अगदी फ्लाइट सारख्याच सुविधा देतात, ज्यामुळे त्यांना खूप पसंत केले जात आहे.
यामुळे नजीकच्या काळात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. विशेष बाब अशी की, आता वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर देशात Vande Bharat Sleeper ट्रेन देखील सुरु होणार आहे.
ही ट्रेन लवकरच लॉन्च होणार अशी बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या ट्रेनची चाचणी लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर होणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर या ट्रेनची चाचणी घेतली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2024 मध्ये या ट्रेनची चाचणी होईल आणि त्यानंतर मग ही ट्रेन प्रत्यक्षात रुळावर चालवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन मुंबई ते भोपाळ आणि भोपाळ ते अयोध्या या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
सध्या या गाड्यांचे डबे बनवले जात असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की 4 जून पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू राहणार आहे, त्यामुळे नवीन वंदे भारत गाड्या सुरू करता येणार नाहीत.
जेव्हा चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि नवीन सरकार स्थापित होईल तेव्हाच ही गाडी रुळावर जाऊ शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुका संपल्यानंतर अनेक नवीन मार्गांवर वंदे भारत गाड्या आणि स्लीपर वंदे भारत गाड्या सुरू करता येतील.
स्लीपर वंदे भारतबद्दल सांगायचे तर त्यात १५ डबे बसवले जाणार आहेत. नजीकच्या काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार आहे.